पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेशपरीक्षा ऑनलाईनद्वारे होणार आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रवेश अर्ज व प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.
विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागांमधील कोर्सेसच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठातील पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश मात्र संबंधित विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन प्रवेश परीक्षेद्वारे देण्यात येतील. प्रवेशांमध्ये तसेच इतर शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश मात्र ऑनलाईनद्वारे होतील, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान,विद्यापीठाची ऑनलाईन प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तसेच देशातील काही प्रमुख महानगरांमध्ये घेतली जाईल. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचा विस्तार तर होईलच, शिवाय विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जवळच्या वा सोयीच्या शहरामध्ये परीक्षा देणे शक्य होईल. ऑनलाईन प्रक्रियेमुळे अर्ज दाखल करण्यापासून ते अभ्यासक्रम व वसतिगृहामध्ये प्रवेश मिळण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेचे सुसुत्रीकरण होणार असून विद्यार्थ्यांना ते सोयीचे होणार आहे असे विद्यापीठाने सांगितले. तसेच संबंधित परीक्षेची सविस्तर माहिती https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे