नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता प्रकरणी नंदुरबारमध्ये काल पोलिसांनी केलेली एक कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. काल नंदुरबारमध्ये मतदान झालं. त्यावेळी पोलिसांनी एका कुत्र्याला ताब्यात घेतलं. कुत्र्याच्या शरीरावर भाजपाचे स्टिकर्स असल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकालादेखील ताब्यात घेतलं.
दरम्यान ,काल नंदुरबारमधल्या नवनाथनगरमध्ये एकनाथ मोतीराम चौधरी (वय ६५ त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. ‘मोदी लाओ, देश बचाओ अशा प्रकारची भाजपाचे स्टिकर्स आणि पक्षाचं कमळ कुत्र्याच्या शरीरावर स्पष्टपणे दिसत होतं अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील मतदान सुरू असताना कुत्र्याच्या माध्यमातून भाजपाचा प्रचार सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली. त्यानंतर शहरात फिरत असलेल्या चौधरी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मतदान सुरू असतानाही प्रचार केला म्हणून चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले .