मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- खासदार उदयनराजे यांनी स्वत: आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 14 सप्टेंबर रोजी उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी ट्विट करत आपल्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहिल.” असं म्हणत उदयनराजेंनी भावनिक ट्विट केलं आहे.
आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
उदयनराजेंनी गुरूवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. उदयनराजे संध्याकाळी दिल्लीला जातील त्यानंतर तेथे ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देतील. यानंतर उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील.
उदयनराजे भोसले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्याबाबत कोणताही अंदाज बांधता येत नव्हता. राष्ट्रवादीतून खासदारपदी निवड झाल्यावर काही काळानंतर त्यांचा सुर पलटला. त्यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडला. भाजप त्यांना खेळवत आहे. अशा बातम्या येत होत्या. मात्र यावर त्यांनी काहीच स्पष्टीकरण दिले नाही. त्यातच गुरुवारी (ता.११) त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याची घोषणा केली होती.