सातारा : बहुजननामा ऑनलाईन- साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल होणार आहेत. याबाबत खुद्द उदयनराजेंनीच माहिती दिली आहे. सोशल मीडिया ट्विटरवर त्यांनी ट्विट केलं आहे. दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी दिल्ली येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश असे त्यांनी म्हटले आहे. उदयनराजेंनी ट्विटरवरून एक इमेज शेअर करत आपल्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. आपल्या ट्विटमधील इमेजमध्ये उदयनराजे म्हणतात की, “दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी दिल्ली येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश.”
उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
उदयनराजेंनी आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत अशी आशा करत म्हटले की, “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहिल.”
शरद पवारांच्या भेटीनंतर घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय
राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी आपला भाजप प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपची महाजनादेश यात्रा रविवारी (ता.१५) साताऱ्यात पोहचत आहे. याप्रंसगी भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करुन राजीनामा दिल्यानंतर ते महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसलेंच्या पक्षांतरावरुन राजकीय वर्तुळात खलबंत चालली होती.
उदयनराजे भोसले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्याबाबत कोणताही अंदाज बांधता येत नव्हता. राष्ट्रवादीतून खासदारपदी निवड झाल्यावर काही काळानंतर त्यांचा सुर पलटला. त्यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडला. भाजप त्यांना खेळवत आहे. अशा बातम्या येत होत्या. मात्र यावर त्यांनी काहीच स्पष्टीकरण दिले नाही. त्यातच गुरुवारी (ता.११) त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याची घोषणा केली.