कुपवाड बहुजननामा ऑनलाईन – अनाथ मुलीला धमकी देऊन जबरदस्तीने डांबून ठेवत पर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. शैला देवीदास भोरे (वय ४५), सुनीता कुमार खोत (वय ४२, रा. कानडवाडी, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत.
कानडवाडी येथील शैला भोरे हिने सुनीता खोत हिच्या मध्यस्थीने मिरजेतील एका महिलेकडे पिडीत अनाथ मुलीला २०१६ मध्ये १.५० लाख रुपयांना विकत घेतले. त्यानंतर पिडीत मुलीला दोन महिने उत्तमपणे सांभाळले. त्यानंतर तिने तू घरातील कामे करत नाही म्हणून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
भोरे ही महिला देवदासी आहे. ती देवीच्या कार्यक्रमात नाचण्यासाठी या पिडीत मुलीचा वापर करत होती. त्यानंतर ती एकदा पलूस येथे असलेल्या देवमामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे तिला घेऊन गेली. तेथे देवीची गाणी गाण्यास आणि नाच करण्यास भाग पाडले. बुर्ली ( ता. पलूस) येथे उरुसासाठी गेल्यानंतर तिने तेथे असलेल्या रोहित नावाच्या मुलाशी तिची ओळख करून दिली. त्यानंतर ती रोहितला कानडवाडी येथे घेऊन आली.
पिडीत मुलीवर गैरफायदा घेत भोरे हिने रोहितबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. भोरे व खोत या दोघींनी तिचे पाय दोरीने बांधून छताला उलटे लटकवून तिला लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. त्यानंतर बुधवारी १७ जूलै रोजी पुन्हा दोघी तिला बेदम मारहाण करत होत्या. हात पाय दोरीने बांधून तिला घरात डांबून ठेवले. त्यानंतर सायंकाळी पिडीत मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर तिने मिरज तालुक्यातील मालगाव येथील नातेवाईकांकडे पलायन केले. त्यानंतर कुपवाड पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर दोघींना पोलिसांनी अटक केली.