मुंबई बहुजननामा ऑनलाईन – टेलीव्हिजनच्या छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने आपल्या अल्पवयीन मुलीचा गळा आवळून त्यानंतर स्वत: ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी कळवा येथील गौरी सुमन सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर उघडकिस आली. त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रज्ञा पारकर असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तर श्रृती पारकर असे तिच्या मुलीचे नाव आहे.
प्रज्ञा पारकर यांचे पती प्रशांत पारकर हे सकाळी जिमला गेले होते. ते घरी परतले तेव्हा घरात आल्यावर त्यांना मुलगी श्रृती बेडवर पडलेली दिसली. तर पत्नी प्रज्ञा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. घरातील ही भयावह परिस्थिती पाहून प्रशांत यांना धक्काच बसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हे लिहिले होते सुसाईड नोटमध्ये
प्रज्ञा पारकर यांच्या घरातून पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. सिरीयलमध्ये काम मिळत नसल्याने प्रचंड डिप्रेशन आले आहे. त्यामुळे मुलगी श्रृतीचा खून करून स्वत: ही आत्महत्या करत आहे. असे प्रज्ञा पारकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. मागील काही महिन्यांपासून तिच्याकडे काम नसल्याने आणि पतीलाही व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.