बहुजननामा ऑनलाईन टीम : अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या विचारात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते. मात्र हा निर्णय त्यांनी मागे घेतला आहे. विद्यापीठ आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या दबावातून ट्रम्प यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. ट्रम्प यांनी जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ऑनलाईन क्लासद्वारे शिकत आहे, त्यांना अमेरिकेत राहण्याची गरज नाही, असे सांगितले होते.
अमेरिकन प्रशासनाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना लवकरात लवकर सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वस्तरातून ट्रम्प यांच्यावर टीका झाली. अखेर मंगळवारी ट्रम्प यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे सांगितले.
न्यायालयात ट्रम्प प्रशासन इमिग्रेशन आणि कस्टम विभागाचे वकील म्हणाले की, या सुनावणीची आता आवश्यकता नाही कारण हा निर्णय मागे घेण्यास तयार आहोत. ट्रम्प सरकारच्या माघारीमुळे अमेरिकेत राहणार्या हजारो विदेशी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाविरुद्ध जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड, एमआयटी या विद्यापीठांनी न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.