बहुजननामा : ऑनलाईन टीम – अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आता केतकीने आणखी एक पोस्ट करत शिवसेनेच्या एका विभाग प्रमुखाने धमकी दिल्याचे म्हटले आहे. केतकीने या पोस्टमध्ये ‘शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळते काय तर लोकांचे पर्सनल नंबर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे!’ असे म्हटले आहे. त्याचबरोबर तिने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रिनशॉटमध्ये ‘महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करता. महाराष्ट्रामध्ये राहून त्यांच्या जीवावर नाव कमावले आणि आज त्यांचा एकेरी उल्लेख करता, मी शिवसेना विभाग प्रमुख आहे. पुन्हा खोटारडे लोक असा शब्द केला ना.. मग बघ,’ असे म्हटले आहे.
‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’ असे केतकीने म्हटले होते.
या पोस्टमुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.