पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पत्नीला मारहाण करत खून करण्याची धमकी देणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील सूस येथे गुरुवारी (दि. 4 ) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
दिनकर शेषेराव मस्के (वय 35 रा. नवी मुंबई), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पती- पत्नी असून दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. आरोपीने मला दुसरे लग्न करायचे आहे असे म्हटल्याने फिर्यादीनी याबाबत विचारणा केली. मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही असे लिहून दे, नाहीतर संध्याकाळी मी कामावरून घरी आल्यानंतर बघ काय करतो, अशी धमकी दिली होती. तसे लिहून न देता फिर्यादी त्यांच्या बहिणीसोबत चारचाकी वाहनातून पुण्यात माहेरी जात होत्या. त्यावेळी संतप्त झालेल्या आरोपी पतीने थांब तू, मी आता सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे, अशी धमकी फोनवरून दिली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीच्या माहेरी येऊन रस्त्यावर थांबला होता. फिर्यादी चारचाकी वाहनाने तेथे आल्या असता आरोपीने दगड मारला. त्यामुळे वाहनाची काच फुटली. मात्र त्यांना मार लागला. तसेच वाहन चालवत असलेली त्यांची बहीण जखमी झाली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादी यांचे डोके वाहनाच्या दरवाजावर आपटू लागला. फिर्यादीच्या बहिणीने प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीने त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. जास्त गर्दी जमत असल्याचे पाहून आरोपीने तेथून धूम ठोकली.