पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – घरगुती गॅस सिलिंडर मधून गॅसची चोरी करुन 4 किलो सेलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने भरून त्याची विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने रावेत येथे बुधवारी (दि.17) दुपारी दोनच्या सुमारास केली. पोलिसांनी 90 हजार 710 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोपट सोमा ढेकळे (रा. प्रगती एम्पायर, लक्ष्मण नगर, थेरगाव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील सिद्धार्थ पुष्पा प्रायव्हेट गॅस एजन्सी नावाच्या दुकानात घरगुती वापराचा गॅस मोठ्या सिलिंडरमधून काढून 4 किलोच्या गॅस सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने भरून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छाप टाकला. यावेळी 17 हजार 600 रुपयांची रोकड, 12 हजार 220 रुपयांचा गॅस, 300 रुपये किमतीचे दोन पितळी रिफिल, 20 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल, 40 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 90 हजार 710 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस हवालदार अनंत यादव, संदिप गवारी, संतोष असवले, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, संतोष बर्गे, पोलीस नाईक महेश बारकुले, विष्णु भारती, मारुती करचुंडे, दिपक साबळे, गणेश कारोटे, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, संगिता जाधव, पोलीस शिपाई योगेश तिडके, मारोतराव जाधव महिला पोलीस शिपाई सोनाली माने योगिनी करचे यांनी केली.