मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या काळात सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले होते. मात्र, आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी केली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याच्या दराने मागील 8 महिन्यातील निचांकी पातळी गाठली असून आज सोन्याचे दर 46 हजारांच्या आत आले आहेत. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 163 रुपयांनी घसरून तो 45 हजार 861 रुपये झाला आहे.
चालू महिन्यामध्ये सोन्याच्या किमतीवर दबाव कायम आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील आयात शुल्कात पाच टक्के कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर कमॉडिटी ट्रेडर्स आणि साठेबाजांनी सोन्याची विक्री सुरु केली आहे. विक्रीच्या माऱ्यामुळे आज (शुक्रवार) मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दराने 46 हजारांची पातळी तोडली आहे.
सोन्याच्या दरात घसरण होत असताना चांदीच्या दरात देखील घसरण सुरु आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये एक किलो चांदीचा भाव 67 हजार 750 रुपये असून यामध्ये 744 रुपयांची घसरण झाली आहे. आज (शुक्रवार) चांदीचे भाव 67 हजार 530 इतके असून चांदीच्या दराची ही नीचांकी पातळी आहे.
Good Returns वेबसाईटनुसार आजचे सोन्याचे दर
मुंबई – 22 कॅरेट सोने – 45690 रुपये
मुंबई – 24 कॅरेट सोने – 46690 रुपये
दिल्ली – 22 कॅरेट – 45540 रुपये
दिल्ली – 24 कॅरेट – 49680 रुपये
चेन्नई – 22 कॅरेट – 43400 रुपये
चेन्नई – 24 कॅरेट 47350 रुपये
कोलकाता – 22 कॅरेट – 46150 रुपये
कोलकाता – 24 कॅरेट – 48850 रुपये
गुरुवारी सराफा बाजार बंद होताना सोने 320 रुपयांनी स्वस्त होऊन सोन्याचा भाव 45867 रुपयांवर बंद झाला. तर चांदीमध्ये 28 रुपयांची किरकोळ वाढ होऊन चांदीचा एक किलोचा भाव 68283 रुपयांवर बंद झाला. जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1782.61 डॉलर असून यामध्ये 0.4 टक्के वाढ झाली आहे.