भाजपा नेतेही राहणार उपस्थित
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – येत्या ३ फेब्रुवारीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ मुंबई प्रदेशचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता एल्फिन्स्टन येथील कामगार स्टेडियम येथे हा मेळावा पार पडणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राज्यभरात विविध विभागात विभागीय मेळावे अयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर ३ फेब्रुवारीला एल्फिन्स्टन येथील कामगार स्टेडियम येथे दुपारी ४ वाजता ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ मुंबई प्रदेशचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. इतकेच नव्हे तर, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमाताई आठवले प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आले आहे.
याचबरोबर, या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षस्थानी सिद्धार्थ कासारे असून मुंबईतील रिपाइंचे सर्व जिल्हा अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या प्रचंड मेळाव्यातून रिपाइंचे मुंबईतील शक्तिप्रदर्शन घडविण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.