नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – येत्या दि. २६ जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील गुराखी गडावर गुराखीराजांचे २७ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरणार आहे. महाकाली मंदिराचे पुजारी देवकर रामराव सटवाजी ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली व गुराखी नटराज सवई गंधर्व गणेशराव वनसागर यांच्या हस्ते दुपारी एक एक वाजता ज्ञानहंडी फोडून संमेलनाचे उदघाटन होणार आहे.
कंधार येथील श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, श्री शिवाजी ग्रामीण विद्यापीठ व गुराखीपीठाच्या वतीने गुराखीराजांच्या साहित्याला हक्काचे गुराखीपीठ व ज्ञानपीठ निर्माण करुन अभिनव असे जागतिक गुराखी साहित्य संमेलन गेल्या २६ जानेवारी १९९१ पासून दरवर्षी सातत्याने माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे हे गुराखीगडावर भरवत आहेत.यंदाचे संमेलन दि. २६ व २७ असे दोन दिवस भरत आहे. संमेलनाचा प्रारंभ दि. २६ रोजी सकाळी १० वाजता किरोडा (ता. लोहा) येथील कामाईच्या गुराखी झऱ्यावर गुराखीराजांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहणाने होईल.
गुराखी देवकर जाणे यांच्या हस्ते डाक वाजवून कामाई मंदिरात कामाई मातेची महापूजा होणार आहे. गुराखेराजे, सालराजे, मेंढपाळराजे, पोतराज, मसनजोगी, वासुदेव, गोंधळी, वाघे-मुरळी, नाथगोसावी, मनकवडे आदी गुराखी कलावंत या वेळी उपस्थित राहणार आहेत. गुराखीगडावर शोभायात्रेने सर्वजण येतील. तेथे सामुदायिक वंदेमातरम व गायत्री मंत्र गाऊन व ज्ञानहंडी फोडुन दुपारी एक वाजता उदघाटन होणार आहे.
उपेक्षित गुराखीराजांच्या कलेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे, सहसचिव ॲड. मुक्तेश्वर धोंडगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, प्राचार्य डॉ. अशोक गवते, प्राचार्य डॉ. जी. आर. पगडे, प्र. प्राचार्या डॉ. सौ. जे. बी. औरादकर, व्ही. जी. चव्हाण, किशनराव पाटील ढगे, सरपंच माधवराव पेटकर आदींनी केले आहे.