नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून २G, ३G ४G आणि ५G नंतर आता ६ G इंटरनेट सेवा आणण्याची तयारी सुरु झाली आहे. तसेच जगभरात ५G चे नेटवर्क मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात असून जपानने आता ६G नेटवर्कसाठी प्रयत्न सुरु केले असून लॉंच करण्यात येणारे ६G चे नेटवर्क ५G पेक्षा १५ पट वेगवान असेल, अशी माहिती मिळत आहे.
जपानमध्ये इंटरनेटचा स्पीड सर्वात जास्त असून २०३० पर्यंत ६G लॉंच करण्यात येईल. यासाठी जपानने मिनिस्ट्री ऑफ इंटरनल अफेयर्स अँड कम्युनिकेशन्स ऑफ जपान गव्हर्नमेंट सिविलियन सोसायटी ऑफ रिसर्चची स्थापना केली असून ६G नेटवर्क विकसित करण्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.
तसेच दक्षिण कोरिया, फिनलँड आणि चीनही ६G नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या नेटवर्कमुळे एक पूर्ण एचडी चित्रपट अवघ्या काही सेकंदात डाउनलोड करता येणार आहे. चीनमधील तीन सरकारी कंपन्यांनी १ नोव्हेंबरपासून ५G सेवा सुरु केली असून चायना मोबाईलने बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसह ५G सेवा सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठीची घोषणा बीजिंगमध्ये झालेल्या तंत्रज्ञान परिषदेत अधिकाऱ्यांनी तीन सरकारी कंपन्या ‘५G’ ची सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.