मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आज मुंबईत होते. त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आणि स्मारक आराखड्याच्या कामाचीही पाहणी केली. दादरमधील इंदूमिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येत असून स्मारकाच्या जागेची पाहणी झाल्यावर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दोन वर्षात काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच स्मारकांचे काम दोन वर्षात पूर्ण होणे शक्य आहे. सध्या स्मारकांचे २५ टक्के काम झाले असून आता कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घेणे आवश्यक आहे, असेही शरद पवार म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब यांचे स्मारक देशाबाहेरही आकर्षक ठरेल. स्मारकाला उशीर होणार नाही याची काळजी घ्यावी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर जयंतीला योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. गर्दीच्या काळात स्मारकाची काळजी घ्यावी लागेल. तसेच पुढे वाडिया रुग्णालयाबद्दल बोलताना वाडियाला त्यांचा निधी मिळेल, पण स्मारक देखील झालेच पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.