मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने या जगाचा निरोप घेऊन आता आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही या धक्क्यातून त्याचे चाहते आणि कुटुंबीयांना सावरले नाहीत. वयाच्या 34 व्या वर्षी आयुष्याचा अंत करणार्या या कलाकाराच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सध्या सुशांत सिंह राजपूत याच्याविषयी सोशल मीडियावर रोज नवनवीन चर्चा पाहायला मिळते. अलिकडेच त्याचा श्वान फज याचादेखील सुशांतच्या आत्महत्येनंतर मृत्यु झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही अफवा असल्याचे समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशांतचा श्वान फज याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. सुशांतच्या निधनामुळे फज अत्यंत उदास झाला असून तो प्रत्येक ठिकाणी सुशांतला शोधत असल्याचे दिसून आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर फजचा अचानकपणे मृत्यु झाल्याची बातमीही सोशल मीडियावर चर्चिली जाऊ लागली. मात्र ही अफवा असून फज आणि सुशांतचे अन्य चारही कुत्रे व्यवस्थित असल्याचे त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे. सोशल मीडियावर मध्यंतरी एका सोफ्यावर मृतावस्थेत असलेल्या एका श्वानाचा फोटो व्हायरल झाला होता. हा श्वान म्हणजे सुशांतचा लाडका कुत्रा फज असल्याचे बोलले जात होते. मात्र हा श्वान फज नसून सध्या तो सुखरुप आणि व्यवस्थित आहे. सध्या फज सुशांतच्या पावना हाऊस येथे आहे. फज हा लॅब्राडोर जातीचा श्वान असून सुशांतने त्याच्यावर जीवापाड प्रेम होते. सुशांतने सोशल मीडियावर फजसोबत काही फोटो, व्हिडीओही शेअर केले होते.