नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या( एसबीआय) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने त्यांच्या खातेधारकांना संभाव्य सायबर हल्ल्याबाबत इशारा दिला आहे. ‘फ्री कोविड19 टेस्टिंग’च्या नावाखाली फेक ईमेल, सोशल मीडिया पोस्ट्स किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे ग्राहकांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा बँकेने दिला आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई येथील ग्राहकांना याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना बँकेकडून देण्यात आल्या आहेत.
देशातील काही मुख्य शहरांमध्ये 21 जूनपासून मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. यासाठी ‘फ्री कोविड19 टेस्टिंग’बाबतचा मेल पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी संबंधित मेल आयडीवरुन आलेल्या मेलवर क्लिक करु नये, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ट्विटरद्वारे करण्यात आले आहे.सायबर गुन्हेगारांकडे जवळपास 20 लाख भारतीयांचे ईमेल आयडी आहेत. त्या सर्व इमेल आयडीवर सायबर हल्लेखोर ‘ मेल पाठवू शकतात. कोव्हिड-19 च्या नावाखाली बनावट इमेल पाठवून त्याद्वारे हे सायबर हल्लेखोर लोकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरी करत आहेत. त्यामुळे सावध राहा, अशा इशारा एसबीआयने दिला आहे.