बहुजननामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतच्या वडिलांची व बहिणीची भेट घेतली. त्यावेळी आपल्याला नक्की न्याय मिळेल असा, विश्वास त्यांनी सुशांतच्या वडिलांना दिला. तसेच सुशांतची हत्या झाल्याचा आपापल्या संशय असून, यामध्ये रिया चक्रवर्तीचा हात असू शकतो, असे सुद्धा आठवले यांनी म्हटले आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाल्याचा संशय मी यापूर्वीच व्यक्त केला होता. हे पाहता या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. संपूर्ण देश आपल्या सोबत आहे, असे आपण सुशांतच्या कुटूंबीयांना सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलं. ज्या लोकांनी सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले किंवा त्याची हत्या केली, अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे सुद्धा आठवले म्हणाले.
सगळ्या गोष्टी बाहेर येतील
सुशांतसिंह राजपूत यांच्या हत्येत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा हात असावा. ही हत्या असो किंवा आत्महत्या, न्याय हा मिळालाच पाहिजे. ही हत्या होती की आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आले हे तपासानंतर उघड होईल, असे आठवले यांनी सांगितलं.
अभिनयात नाव कमावले
सुशांतसिंह राजपूत याने मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात नाव कमावले. मात्र, सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगणाऱ्या बातम्यांवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केला. तसेच असे नाव कमावलेला अभिनेता अचानक कशी काय आत्महत्या करु शकतो, अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. सुशांतचे भविष्य उज्वल होते. या प्रकरणात विविध संस्था तपास करत असून, तपासात निष्काळजीपणा होणार नाही, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.