नवी दिल्ली : बहुजनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रेटी निवडून आले आहेत. संसदेच्या अधिवेशनाला ते गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. पंजबामधील गुरुदासपुर येथून निवडून आलेले अभिनेते सनी देवोल यांनी लोकसभेतील पहिल्या अधिवेशनात 37 दिवसांपैकी तब्बल 28 दिवस गैरहजर राहण्याचा विक्रम केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमधील गुरुदासपूरमधून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या जागी भाजपाने अभिनेता सनी देओल यांना तिकीट दिले होते. या जागी ते बहुमताने जिंकले. मात्र सिनेमात दिसणारी त्यांची देशभक्ती संसदेत दिसलीच नाही. पावसाळी अधिवेशनाचे दिवस वाढवल्यानंतर सनी देओल सलग पाच दिवस अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. मात्र त्यानंतर संपूर्ण एक आठवडा ते गैरहजर होते. केवळ 9 दिवसच त्यांची संसदेत उपस्थिती होती.
संसदेत भाजपच्या सर्व खासदरांनी उपस्थित राहावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असतात. गैरहजर असणाऱ्या सदस्यांची त्यांनी याआधी कानउघाडणी देखील केली आहे. अधिवेशन सुरू असताना दररोज भाजपाचे किती खासदार सभागृहात उपस्थित असतात यावर अमित शहा स्वतः लक्ष ठेवून असतात. तसेच गैरहजर राहणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांवर देखील पुर्णवेळ अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आदेश देखील मोदी यांनी दिले होते. त्यामुळे संसदेत 28 दिवस अनुपस्थित राहणाऱ्या सनी देओल यांच्यावर काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.