अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि नुकतेच भाजपमध्ये गेल्यानंतर खासदार झालेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी एकाच विमानातून दिल्लीला प्रवास केला. एकमेकांचे कट्टर समजले जाणारे थोरात आणि विखे या दोघांनी योगायोगाने एकाच विमानात आल्यानंतर विमानात गप्पा मारल्या. या विमान प्रवासातील दोघांचेही फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे. दोन दिवस अधिवेशनाला सुट्टी होती. त्यामुळे ते नगरला आले होते. त्यानंतर सुजय विखे पाटील पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. तर बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते दिल्लीला पक्षातील वरिष्ठांच्या भेटीला निघाले. मात्र शिर्डी येथून दिल्लीसाठी स्पाईस जेटचे विमान सकाळी साडेदहा वाजता निघणार होते. त्यावेळी दोघांच्याही सीट योगायोगाने एकमेकांच्या शेजारी आल्या. त्यावेळी विमानात दोघांचीही अनपेक्षितपणे भेट झाली. या भेटीनंतर दोघांनी एकमेकांशी चर्चा केली. मात्र नेमकी चर्चा कशावर झाली हे स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, थोरात आणि विखे यांचे मतदारसंघ शेजारीच आहेत. परंतु ते एकमेकांचे कट्टर राजकिय विरोधक मानले जातात. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे विमान प्रवासात दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.