बहुजननामा ऑनलाइन टीम –
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आरोप होताना दिसले होते. यानंतर आता भाजपाच्या भोवतीही संशयाचं धुक निर्माण होताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे सुशांतचा मित्र चित्रपट निर्माता संदीप सिंह याचे भाजपासोबत संबंध आहेत असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, संदीप सिंह यांचा भाजपासोबत काय संबंध आहे, ड्रग माफीयांसोबत काय संबंध आहेत या संदर्भात निवेदन आलं आहे. ते निवेदन आम्ही सीबीआयकडे सोपवलं आहे. आज आणि काल मला अनेक निवेदने मिळाली आहेत असंही ते म्हणाले आहेत.
I have received many requests & complaints to investigate the relationship between Sandeep Singh, who made PM Modi's biopic & BJP; regarding his connection with Bollywood & drugs. I will send these requests to CBI for investigation: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/DcQvLZypqV
— ANI (@ANI) August 29, 2020
पुढं बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर 27 भाषेत चित्रपट तयार करणाऱ्या संदीप सिंह याचे भाजपासोबत काय संबंध आहेत. तसंच संदीप सिंहचे संबंध बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीसोबत काय आहेत याची चौकशी करावी अशी ती निवेदने आहेत. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळं मी ही निवेदने सीबीआयकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहेत. आपल्याला कल्पना आहे की, भाजपाच्या अनेक नेत्यांचा बॉलिवूडसोबत जवळचा संबंध आहे. 5 वर्ष त्यांचं सरकार होतं. त्यावेळी त्यांनी याबाबत काय केलं हा पण एक मोठा प्रश्न आहे” असं म्हणत देशमुख यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
कोण आहे संदीप सिंह ?
सुशांत प्रकरणी संदीप सिंहवर देखील मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप होताना दिसत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या चॅटवरून ड्रग अँगल समोर आल्यानंतर भाजपानं सरकारवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. अशात काँग्रेसचे नेते सचिन सातव यांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत भाजपाच्या अँगलनंही चौकशी करण्याची मागणी केली आहे.