बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख म्हणून राज ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. राज ठाकरे यांची पाठराखण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौकशीतून काही निघेल असे वाटत नाही असे वक्तव्य केले होते. सक्तवसुली संचलनालयाकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हजर झाले असून त्यांची चौकशी सुरु आहे. मुंबईतील काही भागांमध्ये पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, “राजकारणात आम्ही सतत एकमेकांविरोधात उभे राहतो, पण संकटसमयी कुटुंब म्हणून सदैव पाठिशी राहू”. पुढे बोलताना ते म्हणाले की ” ही नोटीस हे काय संकट नाही, एक प्रक्रिया आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. जाहीरपणे उद्धव ठाकरेंनीही हे सांगितलेच आहे “. तसेच हि एक परीक्षा आहे यावेळी तटस्थपणे उभे राहायला पाहिजे. अशा क्षणी आम्ही राज ठाकरेंच्या पाठीशी आहोत असेही ते म्हणाले.
राज ठाकरे चौकशीसाठी सहकुटुंब पोहचल्याने यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्यनारायणाच्या पूजेला गेलेत का ? असा टोला लगावला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सत्यनारायणाची असो की श्रावणाची पूजा …… नसती ती उठाठेव आजिबात नको. संकटसमयी कुटुंबासोबत असणे साहजिक आहे असेही उत्तर त्यांनी दिले.