मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- आज प्रजासत्ताक दिनी राज्य सरकारच्या बहुचर्चित शिवभोजन योजनेचा शुभारंभ राज्यात झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये तर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या योजनेचे उद्घाटन केले. अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात आज पहिली थाळी लाभार्थीला देण्यात आली. ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घ्यायची ऐपत आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
आज मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे नागरिकांसाठी १० रुपयांत आहार असलेल्या 'शिवभोजन' या योजनेचे उद्घाटन केले.
पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. pic.twitter.com/PQVn7uweUa
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 26, 2020
त्रूटी आढळल्यास दूर करू
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गरीबांना पोटभर जेवण मिळावे हा या मागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत 150 थाळ्या देण्यात येणार असल्याने ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घेण्याची ऐपत आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये. सुरवातीला योजना राबविताना काही त्रूटी असू शकतात, त्या समोर आल्यानंतर लगेचच दूर केल्या जातील. या थाळीमध्ये भात, डाळ, भाजी, लोणचे, दोन चपात्या असतील. शहरात आणि ग्रामीण भागात दर वेगवेगळे आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 15 रुपये कमी ठेवण्यात आले आहेत.
मुंबईत 10 रूपयांची थाळी सुरू
आज प्रजासत्ताक दिनी मुंबईत पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवभोजन थाळी योजनेचे उद्घाटन केले. मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृहात ही 10 रुपयांत थाळीची योजना सुरू करण्यात आली आहे. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.
अशी आहे शिवभोजन योजना
गरीब व गरजू व्यक्तींना 10 रुपयांत आहार
भोजन घेतल्यावर एक फोटो क्लिक केला जाईल.
मोबाइल नंबरवर स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद, असा एसएमएस येईल.
जिल्ह्याला एक हजार 350 थाळ्यांचे टार्गेट.
महिला किंवा महिला बचत गटांंना प्रामुख्याने काम मिळणार.
केंद्रांवर वरण-भात, पोळी-भाजी, असे पदार्थ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मिळतील.
सध्या हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर. गर्दी पाहून थाळी वाढवणार.
एका केंद्रावर जास्तीत जास्त 150 आणि कमीत कमी 75 थाळ्यांचे वाटप.
Visit : bahujannama.com