यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – दिल्ली सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपचे नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळमधील शिवसेनेच्या (Shivsena) आंदोलनात विधानसभा मतदारसंघ प्रमुख संतोष ढवळे (Santosh Dhavale) यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (शनिवार) दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले, यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच 12 लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासुन आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नाही तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय त्याची रक्ततुलाही केली जाईल, अशी घोषणा संतोष ढवळे यांनी केली असल्याचे सांगितले.
संतोष ढवळे यांच्या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करु आणि हे काम फत्ते करु, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड याच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.