पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने धक्काबुकी करून शर्ट फाडला. थेरगाव येथे सोमवारी (दि. 22) हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बबल्या उर्फ सागर बापू खताळ (वय 22 रा. थेरगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक पी. डी. कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी आरोपीने जिल्ह्याच्या हद्दीत फिरत होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी थेरगावातील 16 नंबर पाटी येथे थांबल्याची माहिती मिळाल्याने पोलीस त्याच्यावर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने पोलीस नाईक कदम यांच्यासोबत हुज्जत घातली. तसेच कदम यांना धक्काबुक्की करून त्यांचा शर्ट फाडला. तसेच आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे.