पुणे : बहुजननामा ऑनलाईन – तुमच्या वडिलांच्या ओळखीच्या मित्राचा मुलगा बोलत असून, माझे वडील खूप आजारी असल्याने पैश्यांची आवश्यकता असल्याची बतावणीकरून सायबर चोरट्यांनी 2 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विमाननगर भागात राहतात. दरम्यान त्यांना 26 जानेवारी रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्या व्यक्तीने मी तुमच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा बोलत आहे. माझे वडील परदेशातून भारतात विमानाने येत असताना आजारी पडले आहेत, अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांना पैश्यांची खूपच गरज असल्याचे सांगत त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये घेतले. पण फिर्यादी यांना काही दिवसांनी असा कोणी फोन केलाच नाही, याची माहिती मिळाली. यावेळी त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी या तक्रारीची पडताळणी करत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.