पोलीसनामा ऑनलाइन टीम – शिवसेना लोकसभेत पाठिंबा दर्शवते आणि राज्यसभेत त्याला विरोध करते. हा सगळा सावळा गोंधळ असून, यांना स्वार्थ महत्वाचा वाटतो, शेतकऱ्यांचे हित नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आणत असताना ‘जाणता राजा’ म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेला उपस्थित राहत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. कृषी विधेयकासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले, सामान्य कुटूंबातून आल्याने आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. तरी सुद्धा केवळ राजकीय विरोध म्हणून या नव्या विधेयकाला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सभागृहात विरोध केला. शिवसेनेने तर पहिल्या दिवशी लोकसभेत पाठींबा दिला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत त्यास विरोध केला. त्यांना एका दिवसात असा काय साक्षात्कार झाला हेच कळले नाही. अकाली दलाची पंजाब मध्ये बहुसंख्य बाजार समितीवर सत्ता आहे, ती सत्ता जाण्याच्या भीतीपोटी हा पक्ष या कायद्यास विरोध करत आहे. काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात हा विषय मांडला होता. मग आता त्याला विरोध का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
मराठा नेत्यांचा आरक्षणाला विरोध
पंधरा वर्षे आघाडीचे सरकार होते. तरी देखील त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा केला नाही. जाता जाता जो निर्णय घेतला तो तकलादू होता, म्हणून न्यायालयात तो टिकला नाही. मराठा समाजातील काही नेत्यांनाच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटत असल्याचा आरोप, पाटील यांनी यावेळी केला. मराठा आरक्षण प्रश्नी आता भाजप आक्रमक होत आंदोलन करणार असून, जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत ज्या ओबीसी समाजाला सवलती मिळतात, त्या सर्व सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात. त्यासाठी पंधराशे कोटी रुपये जाहीर करावेत. पोलीस भरती करताना मराठा समाजासाठी १३ टक्के राखीव जागा ठेवून भरती करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे तो फसवा फसवी असल्याचे सांगून या सरकारचे सल्लागार तरी कोण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कंगना बाबत विचारले असता पाटील म्हणाले, अनेक प्रकरणात तिची भूमिका योग्य असली तरी मांडण्याची पद्धत चुकीची आहे. तिने शब्द जपून वापरावेत, कुणाच्या भावना दुखवू नये. आपल्या बोलण्याचे दुष्परिणाम तिला कळत नाहीत असा टोला लगावत, शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनाच्या मताशी आपण सहमत नसल्याचे पाटील यांनी सांगितलं.