नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मार्च अखेर निवडणूक होणार असून त्यात महाराष्ट्राच्या ७ जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी दिली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मुंबईमध्ये गुरुवारी दाखल केला. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार यांनी आपल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला असून मागील सहा वर्षात ६० लाखांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
एवढी आहे शरद पवारांची संपत्ती
शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात ३२.३७ कोटी रु.ची एकूण मिळकत जाहीर केली असून त्यात २५,२१,३३,३२९ रुपयाची जंगम आणि २,५२,३३,९४१ रु.च्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
शरद पवारांकडे १ कोटीचे ऋण
शरद पवार यांनी शपथपत्रामध्ये आपल्याकडे १ कोटी रु.चे ऋण असल्याचे नमूद केले असून प्रतिभा पवार यांचे ऍडव्हान्स डिपॉझिट म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचे शपथपत्रात त्यांनी म्हटले आहे. तसेच हिंदू अविभाजीत कुटुंब नियमाप्रमाणे त्यांना ऍडव्हान्स डिपॉझिट म्हणून नातू पार्थ अजित पवार यांच्याकडून ५० लाख रुपये मिळाल्याचेही शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
२०१४ मध्ये होती एवढी संपत्ती
२०१४ च्या राज्यसभा निवडणूकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात शरद पवार यांनी २०,४७,९९,९७०,४१ रु.ची जंगम मालमत्ता आणि ११,६५,१६,२९० रु.ची स्थावर मालमत्ता अशी एकूण ३२.१३ कोटींची संपत्ती जाहीर केली होती.