बहुजननामा ऑनलाइन टीम – घरातील व्यक्ती आजारी राहात असल्यामुळे अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य करण्याचा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील नाईचाकूर येथे उघडकीस आला. एका कुटुंबाच्या घरात चार बाय चार आकाराचा व तितकाच खोल खड्डा (Sensational incident )करुन त्यात पूजेचं साहित्य ठेवल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 2 महिलांसह एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाईचाकूर येथे हैदर महेबुब मुल्ला यांच्या नावे भूकंपतील पुनर्वसित घर आहे. हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने दोन खोलीच्या घरात कुणीही रहात नव्हते. या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पूजा करणार असल्याची माहिती आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलीस पाटील बाळू स्वामी यांना दिली.
बाळू स्वामी यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठ्ठ्ल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली, असता एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला, त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबू असे पूजेचं साहित्य आढळून आले होते. तसंच बाबूस दोन टिकाव, फावडा पडलेला दिसून आला व बाजूच्या खोलीमध्ये 3 कलताणी पोते, दोन लिंबू व नारळ असे साहित्य अघोरी प्रथा व जादुटोणा करून पडलेले दिसले.
याबाबत गावातील सर्व लोकांनी तैसिन पाशामियाँ मुल्ला यांना विचारपूस केली असता तिने असे सांगितले, की ‘माझी उमरगा येथील बहीण नसरिन पटेल ही जास्त आजारी पडत असल्यामुळे तिला एका मांत्रिकाने तुम्ही तुमच्या बंद घरात खड्डा खोदून त्यात नारळ, लिंबू पूजा करून टाका’ असे सांगितले. त्यानुसार मी स्वतः, माझी बहीण नसरिन पटेल, बहिणीचा मुलगा अरबाज २४ ऑक्टोबरला रात्री बारा वाजता आमचे जुने बंद घरातील खोलीमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये लिंबू नारळ व पूजा करणार होतो’, असंही तिने सांगितलं.
दरम्यान, हा प्रकार अंधश्रद्धेतून केल्याचे प्रथमदर्शनी दिसल्याने पोलीस पाटील स्वामी यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.