बहुजननामा ऑनलाईन टीम- कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून आजारी असलेले सहकारातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे काल रात्री पुण्यात निधन झाले. 5 ऑगस्टला त्यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे काल रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
शासकीय आदेशानुसार त्यांचे पार्थिवावर 25 लोकांच्या उपस्थितीतच वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय परिचारक कुटुंबीयांनी घेतला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेने संयम व धीर धरावा ही विनंती,’ असे आवाहन त्यांचे नातू प्रणव परिचारक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. परिचारक हे राज्याच्या राजकारणातील एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जात होते. ते तब्बल 25 वर्षे विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. काँग्रेसमध्ये दिवंगत वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.