नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढून भावही वाढलेल्या सोने-चांदीच्या भावात कोरोनाच्या लसीची घोषणा होताच मोठी घसरण झाली होती. रशियाने लसीचा दावा करताच सट्टा बाजारातील खरेदीदारांनी विक्रीचा मारा सुरु केला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण बाजार गडगडण्यास सुरुवात झाली. मात्र, अमेरिकन डॉलरचे मुल्य घसरल्याने आणि जगभरातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची कंपनी हाथवे बर्कशायरच्या एका मोठ्या करारानंतर सोन्याच्या किंमतीने आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढून 1980 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचल्या आहेत. त्याच प्रमाणे तज्ज्ञांचे मते सोन्याच्या वाढत्या किंमतीचा काळ अद्याप संपलेला नाही. सद्यपरिस्थिती पाहता सोन्याच्या किंमती 2020 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या किंमती वाढू शकतात. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील दशकाच्या मध्यापर्यंत सोने 1800 डॉलरच्या दिशेने वाढेल. जागतिक अर्थव्यवस्थेची अवस्था पाहता सध्या सोन्याचे भाव काहीसे कमी होतील, मात्र ते 1700 डॉलर प्रति औंसच्या वरच राहण्याची शक्यता जास्त आहे.
भारतावर काय परिणाम होतील ?
एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, सध्याच्या काळात सोन्याच्या किंमती वाढण्याची परिस्थिती कायम राहील. कारण जगाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम स्पष्ट पाहायला मिळत आहे. यामुळे भारतीय बाजारात पुन्हा तेजी येऊ शकते. मात्र ही तेजी मर्यादित राहील.अमेरिकन रिसर्च एजन्सी जेपी मॉर्गनचे असे म्हणणे आहे की, दिवाळीपर्यंत सध्या आर्थिक, महामारी आणि राजकीय परिस्थिती पाहता सोने 60 ते 65 हजार रुपये प्रित तोळा पोहचू शकेल. त्यांच्या मते आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली तरी जागतीक अर्थव्यवस्था सुधारण्यास बराच वेळ लागेल, आणि तोपर्यंत सोन्याच्या दरात वाढ होत राहील.