नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वयोवृद्ध आईला पैसे काढण्यासाठी बँकेत खाटेवरुन ओढत नेत असतानाचा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी उत्कल ग्रामीण बँकेच्या मॅनेजरला निलंबित करण्यात आले आहे. ओडिशामध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. एक 60 वर्षीय महिला तिच्या मुलीने खाटेवर ओढत बँकेत नेले होते.
उत्कल ग्रामीण बँकेत सर्वाधिक हिस्सेदारी असलेल्या एसबीआयने सोमवारी बँकेचे बारगाव शाखेचे मॅनेजर अजित प्रधान यांचे निलंबन केले आहे. ‘बँकेच्या मॅनेजरचा त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता. पण व्यवस्थित संवाद न झाल्यानं संबंधित घटना घडली. उत्कल ग्रामीण बँकेने झालेल्या घटनेवर दुःख व्यक्त केले असून आवश्यक कारवाई करण्यात आली आहे’, अशी माहिती एसबीआयकडून देण्यात आली.
ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील खरिअर ब्लॉकमधील बारगाव गावात ही घटना घडली होती. 9 जून रोजी पुंजीमती देई या जन धन योजनेंतर्गत त्यांच्या आईचे 1 हजार 500 रुपये काढण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. मात्र, बँक अधिकार्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि खातेधारकाची सत्यता पडताळणीसाठी आईला बँकेत घेऊन या, असे सांगितले. त्यामुळे दुसर्या दिवशी 10 जून रोजी कोणताही पर्याय नसल्यामुळे देई यांनी आपल्या वयोवृद्ध आईला खाटेवर बसवून बँकेपर्यंत नेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.