नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – फुले, शाहू, आंबेडकरी साहित्य व सांस्कृतिक चळवळीत अग्रगण्य असलेल्या सत्यशोधक विचार मंच या संस्थेचे आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या औचित्याने देण्यात येणारे सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर, सचिव श्रावण नरवाडे व कार्याध्यक्ष ॲड. जयप्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते, विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकीचे कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या योगदानाबद्दल प्रोत्साहित करण्याच्या भावनाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार, पंढरीनाथ केंध्रे, डॉ. पी. जे. थोटे (सामाजिक), विशाल सोनटक्के (पत्रकारिता), याहय्या खान (इले. मीडिया), डॉ. भीमराव वनंजे, राज गोडबोले (आंबेडकरी चळवळ), डॉ. दीपक सोमवंशी (आरोग्य), सुनिता मुंगे, गयाबाई कोकरे (महिला जनजागृती), डॉ. अनिल काळबांडे, प्रा. गजानन देवकर (साहित्य), संजय बगारे (उद्योजक), टी. जी. तुरे (साहित्य), डॉ. साहेबराव ढवळे (सामाजिक) आदी मान्यवरांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी स्वागताध्यक्ष नौनिहालसिंग जहागीरदार, सहसंयोजक डॉ. राम वनंजे, निमंत्रक जी. पी. मिसाळे यांची उपस्थिती होती. पुरस्कार वितरण दि. १७ फेब्रुवारी रोजी येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणार असून संमेलनाध्यक्ष राहूल वानखेडे, डॉ. बबन जोगदंड, प्रा. डॉ. मच्छिंद्र संकटे, डॉ. विमलकिर्ती यांची या वेळी उपस्थिती राहणार आहे.