बहुजननामा ऑनलाइन टीम – मारहाणीत जखमी झालेल्या सैनिकावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी मयत सैनिकाच्या(soldier’s death case) पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे. मयत सैनिक हा सातारा तालुक्यातील सैदापूर येथील रहिवासी आहे.
संदीप जयसिंग पवार (वय-39 रा. सौदापूर, पो. कोंडवे, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या सैनिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी चेतना पवार यांनी फिर्याद दिली आहे. संदीप हे सैनिक असून सध्या ते सुटीवर आले होते. संदीप यांनी रविवारी (दि.27 डिसेंबर) रोजी बेदम मारहाण झाली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संदीप पवार यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
संदीप पवार यांच्या शवविच्छेदन आहवालात त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा तपासासाठी तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.