अमरावती बहुजननामा ऑनलाईन – अमरावतीतील मोझरीतून निघालेल्या महाजनादेश यात्रेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेल्या बॅनरला भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी काळे फासले. त्यानंतर सरकार व भाजप नेत्यांविरोधात जोरदार नारेबाजीही केली. बॅनरवर सध्याच्या नेत्यांची आणि महापुरुषांची प्रतिमा होती. परंतु त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्थान नसल्याने ब्रिगेडने बॅनरवरील पालकमंत्री, भाजप जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या फोटोला काळे फासले.
भाजपची महाजनादेश यात्रा काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गावापासून मोझरी येथून सुरु करण्यात आली. त्यावेळी महाजनादेश यात्रेच्या प्रसारासाठी शहरात बॅनर लावण्यात आले होते. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांच्यासबह वरील बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक आमदारांचे फोटो त्यावर होते. तर महापुरुषांच्या रांगेत लोकमान्य टिळक, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठे यांचे फोटो आहेत.
परंतु महापुरुषांच्या रांगेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या बॅनरवर स्थान न दिल्याने भीम ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर भीम ब्रिगेडचे राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली निलेश बोडखे, अतुल चवरेस ऋषिकेश उके, विक्रम तसरे, आकाश सावळे, प्रकाश पाटील आदी कार्यकर्त्यांनी सरकारसह पालकमंत्र्यांविरोधात जोरदार नारेबाजी केली. तर कार्यकर्त्यांने पंधरा फुट उंचीवर चढून बॅनरवरील पालकमंत्री, भाजप जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या फोटोला काळे फासले. कार्यकर्ते निघून गेल्यानंतर मात्र काही वेळातच तेथून बॅनर हटविण्यात आले.