सांगली : बहुजननामा ऑनलाईन – नातेवाईकांनी आणलेला मावा खायला दिला नाही म्हणून 5 गुन्हेगारांनी केलेल्या बेदम मारहाणीत पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तसेच आरोपीनी जेलमधून सुटून आल्यावर तुला बघून घेऊ, अशी धमकी पोलिसाला दिली. सांगलीतील विजयनगर परिसरातील जिल्हा न्यायालय परिसरात गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणारे हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अर्जुन बापू घोदे (वय 34) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. घोदे यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, उमर शहीद शेख, फारूक अजीज मुल्ला (वय 40) , इरफान मुल्ला (वय 33 तिघे. रा. खणभाग), इलाईस मुसा मुल्ला (वय 30 रा. शामरावनगर), सोहेल खान (वय 20, रा. 100 फुटी रोड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण केलेले सर्व आरोपी संजयनगर येथे 2017 मध्ये झालेल्या खुनातील आरोपी आहेत. त्यांना गुरुवारी तारखेसाठी न्यायालयात आणले होते. त्यावेळी नातेवाइकांनी त्यांच्यासाठी मावा आणला होता. तो खायला दिला नाही म्हणून त्यांनी पोलीस कर्मचारी घोदे यांना मारहाण केली. तसेच जेलमधून सूटून आल्यावर तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.