पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे मेट्रोच्या दोन स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात येणार आहे. मात्र संभाजी ब्रिगेडने पुणेरी पगडीच्या आकाराला विरोध करत, पुणेरी पगडीचा आकार देऊ नये अश्या मागणीचे निवेदन दिले असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने मेट्रो प्रशासनाला दिला आहे.
पुणे येथे होणाऱ्या मेट्रोच्या स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र याचा विरोध करत दरम्यान पुणेरी पगडी विषमतेचं प्रतिक आहे, पुणेरी पगडी घालून बहुजनांवर अत्याचार केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. इतकेच नव्हे तर, पुणेरी पगडीऐवजी छत्रपतींचा जिरेटोप, राजमुद्रा, शिंदेशाही पगडी, फुले पगडी, तुकोबांची पगडी आणि शाहू फेटा या प्रतिकांची स्थानके उभारावी, याचबरोबर या माध्यमातून समाजात समता आणि बंधुत्व निर्माण करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, मेट्रो स्थानकांना पगडीचा आकार देण्याबरोबरच मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावे देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजी उद्यानातील स्थानकाला छत्रपती संभाजी महाराज मेट्रो स्थानक, डेक्कन जिमखान्याला संत तुकाराम महाराज, शिवाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वारगेटला राजमाता अहिल्यादेवी होळकर तर नळ स्टॉप – कर्वे रोडला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले किंवा लहुजी वस्ताद साळवे स्थानकाचे नाव देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान मेट्रोच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या मागण्यांचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर पगडीवरुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.