बहुजननामा ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) च्या विस्ताराची घोषणा केली आहे. आता या प्रणाली अंतर्गत विविध बिले भरता येणार आहे. यामध्ये शाळेची फी, विमा प्रीमियम आणि कॉर्पोरेशन टॅक्सचा समावेश आहे. आतापर्यंत बीबीपीएसच्या मदतीने केवळ डायरेक्ट टू होम, वीज बिल, गॅस बिल, दूरध्वनी बिल आणि पाण्याची बिले भरण्याची परवानगी होती.
रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटले आहे की बीबीपीएसची व्याप्ती वाढविण्यामध्ये सर्व प्रवर्गांची बिले भरणे (प्रीपेड रिचार्ज वगळता) समाविष्ट केले आहे. बीबीपीएस हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) अंतर्गत कार्यरत आहे.
बीबीपीएस वेबसाइटनुसार, विमा प्रीमियम, म्युच्युअल फंड, शाळा शुल्क, ईएमआय आणि कॉर्पोरेशन टॅक्स यासारख्या वारंवार भरल्या जाणार्या बिलांचाही समाविष्ट करण्यासाठी या सुविधेचा विस्तार करण्यात आला आहे. टॅक्समनचे डेप्युटी जनरल मॅनेजर रचित शर्मा म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे भारत बिल पेच्या वापरकर्त्यांची संख्या वाढेल आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल.