नवी दिल्ली : कच्च्या तेलाला लागलेल्या आगीत सोन्याच्या किंमतींना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम १५० रुपयांनी घसरून ३८,९०५ रुपयांवर गेले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते कमी मागणीमुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. मंगळवारी सोन्यासह चांदीच्या भावातही घसरण दिसून आली.औद्योगिक युनिट्स आणि नाणे व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केल्यामुळे चांदीची घसरण झाली. चांदी २९० रुपयांनी घसरून ४८,०२८ रुपये प्रतिकिलोवर आली. जागतिक स्तरावर मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर प्रति औंस १,४९७ डॉलर व चांदीचे औंस १७.८१ डॉलर होते.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितले की, जियोपॉलिटिकलच्या जोखीम वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार चर्चेच्या विकासामुळे आणि अमेरिकेच्या एफओएमसी दर निर्णयामुळे सोन्याच्या किंमतीचा व्यापार होत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी रुपयाची किंमत २८ पैशांनी घसरत होती. यामुळे एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७१.८८ वर आला.
भारतीयांनी दागिन्यांव्यतिरिक्त गेल्या एका महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये १४५ कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. ९ महिन्यांत प्रथमच गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक दिसून आली. सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे सोन्याच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूकदारांचा हा एक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आहे.