बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाच्या उपचारांसाठी दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि. 30) दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्या घरीच विलगीकरणात होत्या. पण मंगळवारी त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. रश्मी ठाकरे यांना नेमक्या कुठल्या कारणामुळे रुग्णालयात केले आहे, याबाबत अजून अधिकृतपणे माहिती समजू शकली नाही.
रश्मी ठाकरे यांची 23 मार्च रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रश्मी ठाकरे यांनी थोडे दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव यांच्याबरोबर कोरोनाची लससुद्धा घेतली होती.
दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सुद्धा मंगळवारी संध्याकाळी तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. पवार यांना गेले दोन दिवस पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे तपासणी केली होती. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. परंतु, प्रकृती बिघडल्यामुळे पवार यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.