बहुजननामा ऑनलाईन – प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानीच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांची स्कार्पिओ गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणाचा तपास NIA करत आहे. या प्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना अटक केली असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. याबाबत NIA ने मंगळवारी (दि. 30) विशेष न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचला गेला, त्या ठिकाणी वाझे उपस्थित होते, असा महत्वपूर्ण दावा एनआयएने केला आहे.
NIA ने हिरेन हत्यासंदर्भात न्यायालयात माहिती दिली. हिरेनच्या हत्येचा कट रचला गेलेल्या बैठकीला वाझेही उपस्थित होते. तसेच विनायक शिंदेही बैठकीत सहभागी होता. हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीशी संपर्क करण्यासाठी वाझेंनी मोबाईलचा वापरही केला होता. NIA च्या युक्तीवादानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर. सीत्रे यांनी आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या कोठडीचा कालावधी 7 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. हिरेन यांची हत्या करण्यामागील हेतू काय होता ?
या कारणाच्या खूप जवळ पोहोचलो असल्याचे NIA ने न्यायालयात सांगितले. यावेळी आरोपी विनायक शिंदे याचा या गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे शिंदेचे वकील गौतम जैन यांनी न्यायालयाला सांगितले. सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला या प्रकरणात जबाबदार ठरवलं गेले नसल्याचे जैन म्हणाले. शिंदे 9 दिवसांपासून कोठडीत असून, आणखी कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तीवादही जैन यांनी केला. दुसरीकडे नरेश गोर यांचा या प्रकरणात फक्त सीमकार्ड पुरवण्यापर्यंतच सहभाग आहे. त्यांना खोट्या प्रकरणात अडकल्याचे गोर यांचे वकील अफताब डायमंडवाले यांनी न्यायालयात सांगितले.