मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईट असणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात ?, त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते ?, भाजपनं त्या पावडरचं नाव सांगावं,’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केला होता. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर उत्तर दिले की, आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो.
२०१४ मध्ये जेव्हा सत्ता हातात नव्हती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आणि ज्या नेत्यांवर भाजपने आरोप केले होते तेच नेते तुम्हाला कसे चालत आहेत. त्यांच नेत्यांना भाजपमध्ये कसे घेतले जात आहे. नेमका त्यांना कोणत्या वॉशिंग मशीन मधून धुतले जाते. असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत सुळे यांच्या प्रश्नाला उत्तर दिले की, आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही, तर डॅशिंग रसायन आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस सुळे यांना म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी नाशिक येथील सभेत टीका केली की, सर्वच रसायने चांगली नसतात. काही रसायने घातक असतात. त्यामुळे त्यापासून सावध राहायला हवे.
या वादात भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही उडी घेतली आहे. दानवे यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रश्न उत्तर दिले आहे. दानवे म्हणाले की, भाजप हीच वॉशिंग मशीन आहे. कोणालाही पक्षात घेण्यापूर्वी आम्ही त्याला या मशीनमधून धुवून घेतो. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे असा टोला दानवे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.