मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण मंत्री पद तर मुलगा सुजय विखे पाटील यांना लोकसभेत उमेदवारी दिली यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटलांची पत्नी शालिनी विखे यांना भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे अशी चर्चा होताना दिसत आहे. असे म्हणले जात आहे की, शालिनी विखे संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. इतकेच नाही तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. म्हणून त्याला आपल्याकडे घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे. नकुत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसला अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आता भाजपकडूनच या निवडणुकीत घराणेशाही होत असल्याची चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीतील आपल्या भाषाणांदरम्यान काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करत अनेकदा टीका केली होती. आता राज्याचे राजकारण पाहिले तर भाजपमध्ये घराणेशाही होत आहे अशी चर्चा होताना दिसत आहे. लोकसभेत सुजय विखे खासदार म्हणून भाजपकडून निवडून आले. यानंतर राधाकृष्ण विखे यांना गृहनिर्माण मंत्री पद देण्यात आले. इतकेच नाही तर शिर्डी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अशात आता शालिनी विखेंना संगमनेर मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी हालचाली सुरु आहेत. शिवाय यासाठी त्या इच्छुक आहेत असेही बोलले जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सलग सातवेळा मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 1985 पासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. युतीत हा मतदारसंघ मात्र शिवसेनेकडे आहे. थोरात यांच्याविरोधात सक्षम असा उमेदवार सेनेकडे नाही. म्हणूनच हा मतदारसंघ भाजपाकडे घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. या मतदारसंघासाठी भाजपकडून शालिनी विखेंच्या नावाची चर्चा विखे गटात दिसत आहे.