पुणे (बहुजननामा ऑनलाइन) : शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुक लढणार आहे. ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढणार या विषयी अनेक शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र ते नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून ‘कर्जत-जामखेड का’ अशी पोस्ट लिहून आपले विचार मांडले आहेत.
रोहित पवार हे गेल्या दोन वर्षापासून कर्जत तालुक्यात विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्यात सहभागी होत होते. मात्र इथेच लढणार असल्याचे त्यांनी यापुर्वी कधीच स्पष्ट केले नव्हते. कर्जत जामखेड मतदार संघ रोहित पवार यांना सुरक्षित मतदारसंघ वाटत असला तरी इथे त्यांचा सामना भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढत पवार यांच्यासाठी नक्कीच सोप्पी नसेल.
फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये रोहित यांनी ‘कर्जत जामखेडची निवड का केली याचे उत्तर देताना म्हटले आहे की, कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. म्हणून एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकिय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो’. रोहित पवार यांच्या मागणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कसा प्रतिसाद देतात याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.