पुणे बहुजननामा ऑनलाईन – येरवडा कारागृहात टोळीयुद्धातून काल हिंदू राष्ट्र सेनेच्या कट्टर समर्थकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पुन्हा हिंदू राष्ट्र सेनेच्या समर्थकांनी एकाच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार आज नुकताच समोर आला आहे. त्याचसोबत काल तुरुंगातील गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यालाही मारहाण केली होती. त्यामुळे येरवडा कारागृहात नेमंक चाललंय काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे. यावर कारागृह निरीक्षकांशी संपर्क साधल्यावर मात्र त्यांनी फोन घेण्याचेच टाळले.
येरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोर धरू लागले आहे. कारागृहात टोळीयुद्धांतून अनेकदा एकमेकांना मारहाण कऱण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून कारागृह प्रशासनाची पकड कैद्यांवर नसल्याचे उघड आहेच. परंतु काल हिंदू राष्ट्र सेनेच्या कट्टर समर्थक तुषार नामदेव हंबीर याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर कारागृहात गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यालाच पुन्हा १४ कैद्यांनी मारहाण केली. दरम्यान या सर्व प्रकारानंतर कारागृह प्रशासनाने चौदा जणांवर गुन्हा दाखल केला. परंतु आज सकाळी हिंदू राष्ट्र सेनेच्या काही जणांनी एका मुस्लीम कैद्याच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कारागृहात घडणाऱ्या या टोळीयुद्धाला नेमकं काय म्हणायचं असा सवाल समोर आला आहे.
कारागृहातील अधिकाऱ्यांची चुप्पी ?
हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या घटनेनंतर कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र चुप्पी साधली आहे. कारागृह निरीक्षक यु. टी. पवार यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. या घटनेबाबत कारागृह प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला नाही.