बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचा दाखला घेऊन फसवणूक

pune-fraudulent-temptation-to-invest-in-thai-company
July 3, 2019

मिरज बहुजननामा ऑनलाईन – बनावट कागदपत्रे सादर करून जातीचा दाखला मिळवत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपाली गौतम कांबळे (रा. गंगानगर, मिरज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर नायब तहसीलदार उमेश कोळी यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दीपाली कांबळे यांनी मिरजेतील सेतू कार्यालयात अनुसुचित जातीचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडला होता. त्यानंतर त्यांना ५ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या सहीचा जातीचा दाखल देण्यात आला होता. दरम्यान हा दाखला बनावट कागदपत्रे सादर करून घेतला असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्यात आली त्यावेळी या जातीच्या दाखल्यासाठी देण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे व त्यासाठी बनावट शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दाखल्यासाठी बोगस आणि बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नायब तहसिलदारांना दिले. त्यानंतर नायब तहसीलदार उमेश कोळी यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.