पुणे : बहुजननामा ऑनलाइन – संचारबंदीत देखील कोरेगाव पार्कमधील सतरंज रेस्टो अँड बारमध्ये अवैधरित्या मद्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी छापा टाकून 8 लाख रुपयांची दारू पकडली आहे. यात विदेशी, देशी आणि बिअर आहेत.
कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख (रा.लेन नंबर ४ कोरेगाव पार्क) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि क. १८८, २६९, २७०,२७३ , प्रोहिबिशन अॅक्ट क .६५(ई) .८२ ,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे क. ५१(१)(ब), महाराष्ट्र कोविड १९ नियम २०२० चे क ११, संसर्गजन्य रोग कायदा १८९७ चे क. ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र तरीही शहरात छुप्या पध्दतीने दारू विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलीस माहिती काढून कारवाई करत आहेत. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना माहिती मिळाली की कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बार याठिकाणी दारू विक्री केली जात आहे.
या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांचे उपस्थितीत उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, पो.हवा मगर, चिखले, पो. ना. बागवान यांच्यासह पथकाने छापा टाकला. यावेळी शेख याला ताब्यात घेतले. तसेच बारमधील ८ लाख ८४ हजार ९१५ रुपये किमतीची देशी विदेशी मद्य व बियर जप्त केल्या आहेत.