मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना १९ ची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे आता स्पष्ट झाले असले तरी ठाणे मनपा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी जितेंद्र आव्हाड हे ३ दिवस कोरोना पॉझिटिव्ह होते, असा धक्कादायक खुलासा केला.
पाटील यांनी म्हटले की, तीन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे कोरोना १९ चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. पण तीन दिवसात उपचार करुन त्यांची दोन चाचण्या अवघ्या तीन दिवसांमध्ये निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणार्या सर्व ७ ते ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड हे आता क्वारंटाईनमध्ये आहेत, असे मिलिंद पाटील म्हणाले.
आव्हाड यांच्या मदतीने आम्ही खूप लोकांपर्यंत मदत पोहोचवत होतो. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. म्हणून आमचीही चाचणी करुन आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण हा संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी दुदैवाने आम्हाला हे काम थांबवावे लागत आहे, असे पाटील यांनी सांगितले.
होम क्वारंटाईन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सुदैवाने माझ्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही प्रोटोकॉलनुसार आता किमान १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकार्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या पोलीस अधिकार्याच्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून एका पत्रकाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.