पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भल्या सकाळी कोथरूड परिसरात गवा (रानटी प्राणी) आल्याची घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये धास्ती भरली आहे. त्याला पकडण्यास वनविभाग आणि पोलीस दाखल झाले आहेत. अद्याप त्याला पकडलेले नाही. तो भिंतींना धडका देत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात गवा जखमी झाला आहे.
कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गवा दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी गव्यापासून दूर पळ काढला. गव्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. तब्बल दहा फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा गवा मोकळ्या जागेमध्ये शिरला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान तो भिंतीला धडका देत आहे. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याला जखम झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान गवा असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती वनविभाग आणि पुणे महापालिकेला कळवली. वन विभागाचे अधिकारी व कोथरुड पोलीस याठिकाणी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याला अजून तरी पकडले गेलेले नाही. गवा हा जंगल परिसरात राहणारा प्राणी असल्याने तो कोथरूडमध्ये कसा आला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महात्मा सोसायटीत आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा गवा दिसून आला आहे. नागरिकांनी त्याला पाहिले. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस व वनविभागाला दिली. वन विभाग व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याला पकडण्याचे काम सुरू केले आहे.
सुनील तांबे (वरिष्ठ निरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे)