पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढत पोलिस आयुक्त गुन्हेगारी टोळ्यांना ‘मोक्का’चा दणका देत आहेत. लोणी काळभोरच्या ‘भाई’ला दणका देत या टोळीवर मोक्काची कारवाई केली आहे. त्यामध्ये 8 जणांचा समावेश असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. पण टोळी प्रमुख पसार झाला आहे. लोणी काळभोरमधील गुन्हेगारीला पोलीस आयुक्तांनी पहिलाच दणका देत पुढील कारवाईचे रूप दाखवले आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दत्ता भीमराव भंडारी (वय 24, रा. पापडेवस्ती, हडपसर), सौरभ विठ्ठल घोलप (वय 22, रा. काळेपडळ, हडपसर), ऋतिक विलास चौधरी (वय 21) आणि साहिल फकिरा शेख (वय 21) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. तर टोळी प्रमुख शुभम कैलास कामठे (कदमवस्ती, लोणी काळभोर) आणि इतर दोन हे फरार आहेत.
शुभम कामठे हा टोळी प्रमुख असून, इतर त्याचे सदस्य आहेत. शुभम हा लोणी काळभोर परिसरात राहतो. तर इतर हडपसर परिसरात राहतात. पुर्व वैमनस्यातून या टोळीने तरुण एटीएम केंद्रात पैसे काढण्यास जाताच त्याला केंद्रात गाठून त्याच्यावर अंत्यत निर्दयीपणे कोयत्याने सपासप वार केले होते. यात तो तरुण थोडक्यात बचावला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एक भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हडपसर पोलिसांनी कारवाईत चौघांना अटक केली. त्यावेळी शुभम कामठे हा गुन्हेगारी टोळी चालवतो. तसेच जखमी तरुणावर वार हे पुर्ववैमनस्यातून तसेच भाईगिरीसाठी त्यांनी हे कृत्य घडले होते घडल्याचे समोर आले.
यानंतर हडपसर पोलिसांनी या टोळीवर मोक्काची कारवाई करावी असा प्रस्ताव उपायुक्त नम्रता पाटील यांना सादर केला होता. त्यांनी त्याची तपासणी केली. तसेच हा प्रस्ताव पाटील यांनी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला. त्यांनी पोलीस आयुक्त अमीताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांना पळता भुई केली आहे. आयुक्तांनी 22 मोक्का कारवाई केली आहे.